BISWAS Nov 1 Issue 18 | Page 97

तुमच्या मनोधैर्याचे, सकारात्मक विचारसरणीचे पुरते खच्चीकरण कोरोनाच्या दहशतीने केल्यानंतर आता सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा बोध देणारे वर्ग सुरू होतील.

वर्षानुवर्षे नापिकी सहन करून पुन्हा नव्या मनोधैर्याने शेती करणार्या, बँकेत, बाजारपेठेत वारंवार अपमान सहन करून शेतीत राबण्याची जिद्द न सोडणार्या शेतकर्यांना हे काय सकारात्मकता शिकविणार?

केवळ बुद्धीभ्रम पसरवून स्मृतिलोप करून बुद्धिबंद स्वामिनिष्ठ समाज उभा करणार्यांना कोरोना आवडतो.

हे साधे कारस्थान नाही, म्हणून मागील १५ महिन्यांत आम्ही नागरिकांना वारंवार सावध केले आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधीच काढून घेत मश्गुलतेत सत्तेचा स्वार्थाकरिता उपभोग घेणार्यांना कोरोना आवडणार नाही तर काय?

औषध मार्केटिंगचा भयानक विळखा पडला आहे. किराणा दुकानापेक्षा औषधाच्या दुकानात गर्दी असते.

मंदिरांतील गर्दी, औषधाच्या दुकानांतील गर्दी, कोर्टात गर्दी, तुरुंगात गर्दी, नेत्यांच्या दरबारातील गर्दी, हे आजारी समाजव्यवस्थेचे लक्षण आहे, हे मी वारंवार सांगितले आहे.

अच्छे दिन आले नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा! वेळेवर कर्ज मिळत नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण आहे कोरोनाचा बागुलबुवा!, पेट्रोल, डिझेल, खतांची भाव वाढ झाली, बियाण्यांचे भाव वाढले, शेतमालाला भाव मिळत नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा!

औषधांचे भाव वाढले, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा! कोरोनाने नोकरीची दालने बंद केली, पोटाचे प्रश्न उभे केले, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण आहे कोरोनाचा बागुलबुवा.

शेतमालाचे भाव पडलेले मात्र खाद्यतेलाचे भाव कल्पनेच्या बाहेर वाढले, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा!

समाजाच्या लुटीला कोरोनाने मुक्तहस्ते परवानगी दिली. समस्यांच्या मांडणीकरिता होणार्या आंदोलनाचा नेत्यांच्या, राज्यकर्त्यांच्या डोक्याचा तापच कोरोनाने दूर केला. मग कोरोना कोणाला आवडेल, हे काय वेगळे सांगायचे.

कोरोनाच्या नावाचे हे भयानक कारस्थान आहे. माणसाने माणसापासून अंतर राखून राहावे, याचे नियोजन कोरोनाने केले. त्याला नाव दिले सोशल डिस्टन्सिंग, शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात सोशल डिस्टन्सिंग कसे, फार तर ते फिजिकल डिस्टन्स असावे, शाहू, फुले, डॉ.आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांनी सोशल डिस्टन्सिंग दूर करण्याकरिता जीवन खर्ची घातले. कोरोनाने पुन्हा सोशल डिस्टन्सिंग शब्द आणला. हे नवे कारस्थान नाही काय, कोणी पुन्हा आणला सोशल डिस्टन्सिंग शब्द?

कोणी पुन्हा आणला सोशल डिस्टन्सिंग शब्द?