BISWAS Nov 1 Issue 18 | Page 106

गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताप्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने सांसदीय राजकारणाला ज्या विधिनिषेधशून्य पद्धतीने खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे, तोच प्रयोग आज सगळेच विरोधी पक्ष करत असल्याचे दिसून येते; नव्हे सत्ताधार्यांना थेट सहकार्य करीत असल्याचे दिसून येते. विरोधी पक्षाची आक्रमक, पण विधायक भूमिका अलीकडच्या दोन दशकांमध्ये बहुतेक सर्वच विरोधी पक्ष विसरले आणि कोरोनाकाळात तर बहुतांश विरोधी पक्ष मृतप्रायः झाल्याने तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?

देशात चाललेल्या आजच्या घडामोडी पाहता देश एका प्रचंड ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे असे वाटते. या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लोक कधी रस्त्यावर उतरतील, ते सांगता येत नाही. प्रचंड असंतोष देशात माजला आहे व लोक फक्त आता संधीची वाट पाहत आहेत, फक्त ठिणगी पडायचा अवकाश आहे, लोक रस्त्यावर उतरून सर्व झुगारून देतील हे निश्चित.

देशातील या असामान्य परिस्थितीस जबाबदार आहेत एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे सगळे राजकीय पक्ष; जे कोरोना या एका विषयावर मात्र 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' याप्रमाणे टेस्टिंगपासून ते लॉकडाऊनपर्यंतच्या सगळ्या बाबींमध्ये सत्ताधार्यांच्या सुरात सूर मिळवू लागले आहेत.

जगाने कोरोना व्हायरसचा उभा केलेला बागुलबुवा आपले अपयश झाकण्यासाठी अगदी मोक्याच्या क्षणी सत्ताकारण्यांच्या चांगलाच उपयोगात आलेला दिसतो, पण यावेळी सगळेच विरोधी पक्ष आणि राजकारणी सत्ताधार्यांच्या प्रत्येक खेळीत सामील झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. आता तर विरोधकांच्याही सुरात नाटकीपणा आलाय. नेमके सत्ताधार्यांना जे हवे असते, तोच अजेंडा जवळपास सगळेच विरोधी पक्ष राबवत आहेत; त्यामुळे सत्ताधार्यांचे काम अगदीच सोपे झालेय.

सत्ताधार्यांनंतर विरोधकही पुनरुक्तीतून कोरोनाच्या नावाखाली जनतेत दहशत निर्माण करीत आहेत, जेव्हा की सत्ताधार्यांना जनतेला घरात डांबून ठेवायचे आहे, पर्यायाने अघोषित आणीबाणी लादायची आहे; परंतु आपण पाहतोय, की सगळेच विरोधी पक्ष या षड्यंत्रात सरकारला सहकार्यच करताहेत. खरे तर कोरोना हे सुनियोजित षड्यंत्र आहे, याची खात्री होऊनही प्रक्षुब्ध विरोधक सत्ताधारी मोदी सरकारला आता पूर्वीप्रमाणे जनतेच्या मूळ समस्यांवर जाब विचारताना दिसत नाहीत ते का? नेमके पाणी कोठे मुरते आहे?

अर्थात, विरोधकांमध्ये खरोखरची कळकळ असती वा नसती तरीही सत्ताधार्यांचा गेमप्लान तयार होता; मात्र विरोधी पक्षांना कोरोनाचे हे नाटक कळत नाही की तेसुद्धा दहशतीखाली आहेत; हेच समजेनासे झाले आहे.

कोरोनाकाळात विरोधी पक्ष