BISWAS Nov 1 Issue 18 | Page 100

कथा करोना नावाचा राक्षस

दिवसभराच्या कामाने थकून मी नुकतीच बसले होते. चार महिने कामाला बाई नसल्याने tv जेवण, कपडे-भांडी, लादी-पोछा करून माझा घामटा निघत असे. आता सुद्धा तशीच दमून सोफ्यावर रेलून बसले होते, तेवढ्यात दाराची कडी वाजली मी दुर्लक्ष केलं ह्या लॉक डाऊनच्या काळात कोण येणार? आणि आलेच तर बेल वाजवेल कडी कशाला वाजवणार? असा विचार करून मी स्वस्थच बसले . थोड्या वेळाने जरा जोराने पुन्हा कडी वाजली आता मात्र उठणे भागच होते, उठून मी दार उघडले तर समोर राम उभा होता

' अरे राम इतक्या संध्याकाळी तू इकडे कोठे? ' त्याला आत घेत मी विचारले आता त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. हा राम माझ्याकडे काम करणाऱ्या सखूचा मुलगा.

तिच्या बरोबर बरेचदा तो यायचा, 5ते6 वर्षाचा असावा तो तो रडताना बघून मी घाबरून गेले सखुला किंवा तिच्या नवऱ्याला काही झाले की काय ?

माझ्या छातीत धस्स झाले मी त्याला सोफ्यावर बसविले त्याचे रडणे सुरूच होते. त्याला खाऊ आणण्यासाठी मी आत गेले. हुंदक्यावर हुंदके देत तो रडत होता. रडण्याचा आवाज ऐकू न आतल्या खोलीत टीव्ही बघत बसलेला सुभाष बाहेर आला,

रडत असलेल्या राम ला बघून तो चक्रावलाच मधु ए मधु अग बाहेर ये हा राम का रडतोय बघ तो ओरडायला आणि मी बाहेर यायला एकच गाठ पडली.

मी रामच्या जवळ जाऊन प्रथम त्याला प्यायला पाणी दिले. दोन्ही हातात ग्लास धरून तो घटघट पाणी प्याला, त्याच्या समोर ठेवलेल्या बशीतून त्याने ज्या तर्हेने दोन्ही हातांनी बिस्किटे उचलली त्या वरून तो काही दिवसाचा उपाशी वाटत होता. सुभाषने खुण करून त्याला दूध द्यायला सांगितले. दूध व बिस्किटे खाऊन त्याला जरा हुशारी आली. हं आता सांग मला काय झालंय ? आई बाबा बरे आहेत ना? मी विचारले पण माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच त्याने मलाच विचारले मावशी करोना कुठाय? तो कुठे रहातो? आणि तो मारणार आम्हाला?

त्याच्या त्या निरागस प्रश्नाला मी काय उत्तर देणार होते? तेवढ्यात तो पुढे म्हणाला आमच्या चाळीत सगळे घरीच बसतात कोणीच कामाला जात नाही. आम्हा मुलांना देखील बाहेर खेळायला पाठवीत नाहीत म्हणतात करोना येईल. आज चार दिवस झाले आम्ही जेवलो नाही. सांग ना मावशी कोण आहे हा करोना ? राक्षस आहे का? रस्त्यावर कोणी दिसलं की त्याला खातो का? मला कोणी सांगत नाही म्हणून

तुला विचारायला कोणाला न सांगता मी गुपचूप आलो. सांग ना ग तो खाणार आपल्याला?

मला त्या निष्पाप मुलाला काय उत्तरे द्यावी ते कळेना एक अक्खा बिस्कीट चा पुडा मी त्याला दिला. सखुला देण्यासाठी सुभाषकडे पैसे देऊन रामला घरी पोहोचवून यायला सांगितले.

मी विचार करू लागले करोना रुपी राक्षस सर्वांच्या मानेवर बसला आहे आणि त्याची शिकार होऊ नये म्हणून माणूस भूकंबळीचा शिकार होतोय.

डॉ मीनल कुष्टे

करोना नावाचा राक्षस